Thursday, 26 November, 2009

बाप

बाप

बाप एक
नांव असतं ;
घरातल्या घरात
बागुलबुवा नावाचं
गांव असतं !

सर्वात असतो
तेंव्हा जाणवत नाही ?
नुसत्या नजरेचा इशारा आला
तरीही नाही म्हणवत नाही !!

आई सांगते,
मुलं थरथरतात
घाबतलेल्या मनात
काटे सरसरतात.

बाप काना-कानात
तसाच ठेऊन देतो कांही.
हाताचे कानाला कळावे
असे देऊन जातो कांही.

बाप असतो
एक धागा
सारे समजूनही
भावनाविवश न होणारी जागा.

घर उजळत तेंव्हा ,
त्याचं असतं भान
विझून गेला अंधारात की ;
वाट्ते आता
कुणी पिळायचे कान ?

बाप घरात नाही ?
तर मग कुणाशी बोलतात
या अनाथ
दिशा दाही ?

बाप खरंच काय असतो ?
लेकराचा बाप असतो,
जरी डोक्याला ताप असतो.
ज्याच्या नशिबी फक्त
रागीट्पणाचा शाप असतो!!

बाप असतो
जन्माची शिदोरी,
फ.मुं.च्या आईसारखीच !
सरतही नाही,
उरतही नाही.

बाप एक
न कळालेलं गाव असतं !
नसतो तेंव्हा,
बिनबापाचे
हे नाव असतं !!

(कविवर्य फ.मुं. शिंदे यांची मन:पूर्वक क्षमा मागून)

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com

No comments:

Post a Comment