Showing posts with label परीक्षा.... Show all posts
Showing posts with label परीक्षा.... Show all posts

Wednesday, February 28, 2018

परीक्षा....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता



विडंबन कविता
---------------------
परीक्षा
परीक्षा
एक नांव असतं ;
सेंटर सेंटरमध्ये
गजबजलेलं गांव असतं !
सर्वात असते तेंव्हा
जाणवत नाही ?
कॉपीसाठी कुणालाही
नाही म्हणवत नाही !
जत्रा पांगते,
पालं उठतात.
पोरक्या सेंटरमध्ये
उमाळे दाटतात.
परीक्षा मनामनात
तशीच जाते ठेवून काही.
पाण्यावाल्यापासून
झेरॉक्सवाल्यापर्यंत
सगळ्यांनाच देवून
जाते बरेच काही.
परीक्षा असते
एक धागा
पालकांच्या कर्तृत्त्वाला
चालना देणारी जागा.
परीक्षा येते तेंव्हा,
कुणालच नसतं भान.
पेपरमध्ये द्यायला
अपुरं पडतं रान.
याहून निराळी
असते परीक्षा?
इथे कुबेरसुद्धा
भिकाऱ्याला
मागतो भिक्षा.
परीक्षा खरचं
काय असते?
लेकरांची माय असते,
झेरॉक्सवाल्यांची
गाय असते.
सोशल मीडीयालाही
तीची हाय असते.
वाघिणीच्या दुधावरची
साय असते.
परीक्षा म्हणजे
जन्माची शिदोरी,
सरतही नाही,
उरतही नाही.
परीक्षा
एक नाव असतं !
नसते तेंव्हा
शाळेतल्या शाळेत
बरबटलेलं गाव असतं !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-.९९२३८४७२६९
---------------------------------
पूर्वप्रसिद्धी- दैनिक झुंजार नेता
(कविवर्य फ.मुं.शिंदे यांची मन:पूर्वक क्षमा मागून)