Sunday, March 28, 2010

झाकण्यापुरता कपडा पाहिजे नको टोचाया चोळी..सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


 विडंबन कविता


झाकण्यापुरता कपडा पाहिजे 
नको टोचाया चोळी 

झाकण्यापुरता कपडा पाहिजे 
नको टोचाया चोळी 
बघणार्‍याचे डोळे हजारो 
मी तर त्यांना जाळी. 

हवा तितका पाडी पाऊस 
डायरेक्टर वेळोवेळी 
सीनपुरता नेतो आंम्हा 
वाहत्या धबधब्याखाली. 

एक वीतिच्या भागास पुरते 
तळ हाताची खेळी 
बघणार्‍याचे डोळे हजारो 
मी तर त्यांना जाळी. 

साड्या-बिड्या नकोत आता 
एक ब्रेक दे राया 
गरजेपुरती देई वसने 
दर्शन घडण्या काया . 

चापून-चोपून नको बसाया 
नको कुणाची टाळी. 
बघणार्‍याचे डोळे हजारो 
मी तर त्यांना जाळी. 

आहे तितुके दाखवयाचा 
हट्ट असे गा माझा 
घणार्‍याचे निवतील डोळे 
रंक असो वा राजा. 
नागवेपण हि ना लगे,...
ना लागे पस्तावाची पाळी 

बघणार्‍याचे डोळे हजारो 
मी तर त्यांना जाळी. 

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (कविवर्य नारायण सुर्वे यांची माफी मागुन)

Sunday, March 21, 2010

साहित्य संमेलन....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


साहित्य संमेलन ...

साहित्य संमेलन एक नाव असतं. 
त्यांच्यातल्या त्यांचेच बजबजलेलं गाव असतं! 

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही. 
आता असलं कुठं तरीही जाऊ म्हणवत नाही. 

जत्रा पांगते पालं उठतात. 
पोरक्या प्रतिभेत उमाळे दाटतात. 

साहित्य संमेलन मनामनात असेच जाते ठेवून काही. 
त्यांचं त्यांनाच कळावं असं जाते देऊन काही. 

परीसंवाद असतो एक धागा. 
बगलबच्चांची वर्णी लावणारी एक हक्काची जागा. 

कवी संमेलन सुरू होते तेंव्हा कविंना नसते भान. 
त्याच त्याच कविता वाचू नयेत याचेही नसते ज्ञान. 

रसिक येतात जातात जीव मात्र व्याकुळच 
त्यांची कधीच भागत नाही तहान. 

दिसत असलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल की, 
सापडतेच संमेलनातली घाण. 

याहून का निराळे असते साहित्य संमेलन? 
हे संमेलनात नाही, तर मग कुणाशी लढतात विद्रोही 
कुणाविरूद्ध त्यांची द्वाही? 

साहित्य संमेलन खरंच काय असते? 
प्रकाशकांची माय असते, नवोदितांसाठी गाय असते. 
गोरगरीबांची हाय असते. लंगड्ता पाय असते, 

प्रायोजकांची सोय असते. साहित्य संमेलन असते 
अनुदानाची शिदोरी पुरतही नाही. उरतही नाही! 

साहित्य संमेलन एक नाव असतं. 
नसते तेव्हा रसिकांच्या मनात गलबललेलं गाव असतं!! 

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (कविवर्य फ.मुं.शिंदे यांची माफी मागुन)

Tuesday, March 16, 2010

गाणार्‍याने गात जावे...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

गाणार्‍याने गात जावे 

गाणार्‍याने गात जावे 
ऐकणार्‍याने ऐकत जावे 
उकांड्यावरच्या गाढवाकडून 
खिंकाळणार्‍या घोड्याकडून 
गाण्यासाठी चाल घ्यावी. 

असो अग्रलेख वा निबंध 
त्याला गाण्याची चाल द्यावी. 
वेड्यापिशा शैलीत गाताना 
वेडेपिसा अभिनय करावा. 
पतंग ओढता ओढता 
तबलजीचा हात धरावा. 
तर्ररsss झालेल्या गुरूकडून
झिंगणारी शैली घ्यावी. 

तृप्त झालेल्या रसिकांकडून 
बिदागीची थैली घ्यावी. 
गायनाचा हिमालय नको, 
गाणार्‍याने सखल व्हावे. 
शेकडो झाले रिऍलिटी शो 
पटकन त्यात दाखल व्हावे. 

गाणार्‍याने गात जावे 
गाणार्‍याचे खळे व्हावे. 
ऐकता ऐकता एक दिवस 
गाणा-यांचे गळे घ्यावे. 

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (विंदा करंदीकर यांची माफी मागुन)

Monday, March 8, 2010

मराठीच्या खांद्यावर हिंदीचे ओझे....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

|| विडंबन ||

मराठीच्या खांद्यावर हिंदीचे ओझे 

मराठीच्या खांद्यावर हिंदीचे ओझे 
कशासाठी उतरावे बांबू घेऊन ? 
कोण बोले कोणासाठी 
फक्त घोकून बघतात 
येथे कुणी मनात लाजून तरी 
कसे झुलतात मावळे हे राजे ? 

लोक सारे गेले येथे विरुन विझून 
भाषा जाई हिंदीत गोठून झडून 
अमृताशी घेई पैजा चूकून माकून ? 
म्हणती हे वेडे परी कुणी न लाजे 

संथ झाली लढ्या आधी मनाची व्याधी 
अस्मितेची गाणी म्हणजे डरकाळी साधी 
देई कोण हळी त्याचा पडे बळी 
आधी १०५ जणांचे हौतात्म्य अजूनही ताजे 

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 ( आरती प्रभू यांची माफी मागुन )

Monday, March 1, 2010

जिकडेतिकडे ज्ञानीच ज्ञानी...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

विडंबन कविता


जिकडेतिकडे ज्ञानीच ज्ञानी 

जिकडेतिकडे ज्ञानीच ज्ञानी 
खळखळणारे झरे, 
बडबडणारे पाळीव पोपट 
लव लवणारे सारे. 

नवी उथळता विचारांवरती 
सुखात हे पोपट राहती, 
थुंकी-बिंकी झेलित जाती 
ही वखवखती पाखरे, 

जिकडेतिकडे ज्ञानीच ज्ञानी 
खळखळणारे झरे. 

हासत मोजती निळसर नोटा 
गड्या, दारूच्या घेती घोटा 
घेती सुपारी, पानोपानी 
धंदा पवित्र ठरे, 

जिकडेतिकडे ज्ञानीच ज्ञानी 
खळखळणारे झरे. 

मधेच घेती सारे पलटी 
या पोपटांची सोला सालटी 
वातानुकुलित विचार गोजिरे, 

जिकडेतिकडे ज्ञानीच ज्ञानी 
खळखळणारे झरे.

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (कविवर्य शंकर वैद्य यांची माफी मागुन)