Sunday, 21 March, 2010

साहित्य संमेलन

साहित्य संमेलन

साहित्य संमेलन एक
नाव असतं.
त्यांच्यातल्या त्यांचेच
बजबजलेलं गाव असतं!

सर्वांत असते तेव्हा
जाणवत नाही.
आता असलं कुठं तरीही
जाऊ म्हणवत नाही.

जत्रा पांगते
पालं उठतात.
पोरक्या प्रतिभेत
उमाळे दाटतात.

साहित्य संमेलन मनामनात
असेच जाते ठेवून काही.
त्यांचं त्यांनाच कळावं असं
जाते देऊन काही.

परीसंवाद असतो
एक धागा.
बगलबच्चांची वर्णी लावणारी
एक हक्काची जागा.

कवी संमेलन सुरू होते तेंव्हा
कविंना नसते भान.
त्याच त्याच कविता वाचू नयेत
याचेही नसते ज्ञान.

रसिक येतात जातात
जीव मात्र व्याकुळच
त्यांची कधीच भागत नाही तहान.
दिसत असलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो
खोल खोल की,
सापडतेच संमेलनातली घाण.

याहून का निराळे
असते साहित्य संमेलन?
हे संमेलनात नाही,
तर मग
कुणाशी लढतात विद्रोही
कुणाविरूद्ध त्यांची द्वाही?

साहित्य संमेलन
खरंच काय असते?
प्रकाशकांची माय असते,
नवोदितांसाठी गाय असते.
गोरगरीबांची हाय असते.
लंगड्ता पाय असते,
प्रायोजकांची सोय असते.

साहित्य संमेलन असते
अनुदानाची शिदोरी
पुरतही नाही.
उरतही नाही!

साहित्य संमेलन
एक नाव असतं.
नसते तेव्हा
रसिकांच्या मनात
गलबललेलं गाव असतं!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बी्ड)

(कविवर्य फ.मुं.शिंदे यांची माफी मागुन)

No comments:

Post a Comment