Sunday, June 18, 2017

बाप...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता




















वि।डं।ब।न।क।वि।ता
-------------------------

बाप एकनांव असतं
घरातल्या घरात
बागुलबुवा नावाचं
गांव असतं !

सर्वात असतो
तेंव्हा जाणवत नाही ?
नुसत्या नजरेचा इशारा आला
तरीही नाही म्हणवत नाही !!

आई सांगते,
मुलं थरथरतात
घाबतलेल्या मनात
काटे सरसरतात.

बाप काना-कानात
तसाच ठेऊन देतो कांही.
हाताचे कानाला कळावे
असे देऊन जातो कांही.

बाप असतो
एक धागा
सारे समजूनही
भावनाविवश
न होणारी जागा.

घर उजळत तेंव्हा ,
त्याचं असतं भान
विझून गेला अंधारात की ;
वाट्ते आता
कुणी पिळायचे कान ?

बाप घरात नाही ?
तर मग कुणाशी बोलतात
या अनाथ
दिशा दाही ?

बाप खरंच काय असतो ?
लेकराचा बाप असतो,
जरी डोक्याला ताप असतो.
ज्याच्या नशिबी फक्त
रागीट्पणाचा शाप असतो!!

बाप असतो
जन्माची शिदोरी,
फ.मुं.च्या आईसारखीच !
सरतही नाही,
उरतही नाही.

बाप एक
न कळालेलं गाव असतं !
नसतो तेंव्हा,
बिनबापाचे
हे नाव असतं !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
     9923847269

(कविवर्य फ.मुं. शिंदे यांची मन:पूर्वक क्षमा मागून)

Saturday, April 8, 2017

चेंडोबा चेंडोबा थकलास का ? ...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

चेंडोबा चेंडोबा थकलास का ?

चेंडोबा चेंडोबा थकलास का ?
आयपीएलच्या पैशामध्ये लपलास का ?
आयपीएल चे झाड बेधुंदी,
क्रिकेटचा राडा बेबंदी !
कसोटी-वनडॆ वर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?

आता तरी परतुनी जाशील का ?
चौकार षटकार खाशील का ?
कसोटी बिच्चारी रडत असेल,
वनडॆचा पारा चढत असेल !
असाच बसून पहाशील का ?
मालकांची बोलणी खाशील का ?

 म्हातारे सगळे तरूण झाले,
फिटनेस-बिट्नेस करून आले.
त्यांच्याप्रमाणे तुही नाचशील का?
जादू की झप्पी घेशील का?

चेंडोबा,चेंडोबा कुठे रे गेला ?
ठोकता ठोकता गडप झाला !
चिअर्स गर्ल्सला समजून घेशील का?
टॅक्सवाल्यांना तोंड देशील का ?

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
 मोबाईल-9923847269

 (कविवर्य ग.दि.माडगूळकर यांची क्षमा मागून)
22एप्रिल2010

Monday, April 25, 2016

गर्जा मद्यराष्ट्र माझा.....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता


। विडंबन कविता ॥

*गर्जा मद्यराष्ट्र माझा....*

जय जय मद्यराष्ट्र माझा, 
गर्जा मद्यराष्ट्र माझा ......

द्राक्ष, काजू, मका, जांभूळ, 
ज्वारी, बाजरी करवंदाची भरती अर्क, 
मद्याच्या घागरी 
भीमथडीच्या पट्ट्यांना या 
गुळाचे पाणी पाजा ॥१॥

भीती न आम्हां तुझी मुळीही, 
फसफसणाऱ्या गुळा 
विदेशीच्या त्या मनमानीला, 
जबाब देशी खुळा 
दारिद्रयाचा सिंह गर्जतो, 
कंट्री ब्रँड माझा 
दऱ्या-खोऱ्यातून भट्ट्या लागल्या 
माल मिळे ताजा ॥२॥

गळ्या गळ्यामध्ये विरली दारूबंदीची गाणी 
मद्यसम्राट खेळती, खेळी जीवघेणी 
धाब्या-धाब्यावरती पाजतो, 
बापास पोरगा कुठे लाजतो?
परमीट रूमचे दार पूजतो, 
ड्राय डेचेही तख्त फोडतो, मद्यराष्ट्र माझा ॥३॥

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
  मोबा. ९९२३८४७२६९

( कविवर्य राजा बढे यांची क्षमा मागून)

३० एप्रिल २०१०

http://suryakanti1.blogspot.in/


Thursday, March 28, 2013

अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली



विडंबन कविता

अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली !

अतिरेकी पोसता पोसता काय गत झाली !
अरे, पुन्हा पाकिस्तानच्या मिटवा मशाली !

त्यांनी कश्मिरचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांचे वाट का पहावी ?
कसा पाक अमेरिकेच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती हिरवे साप हे विषारी !
आम्ही आज ऐकत असतो त्यांचीच खुशाली !

धर्मात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी अतिरेक्यांची पडे धूळमाती !
फुकट मेले अतिरेकी ज्यांच्या प्रेता ना वाली !

असे कसे पाकड्यांनी जोडले घरभेदी?
असे कसे पाकधार्जिने, येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखातही जॅकेटची दलाली !

उभा पाक झाला आता एक बॉम्बशाला
जिथे बेनझीरचाही रंग त्यांना ना कळाला !
कसे भुत्तो दुर्दैवी अन्‌ बाकी भाग्यशाली !

धुमसतात अजुनी फेकल्या बॉम्बचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती धर्मांध सारे !
आसवेच अतिरेकाची पाकड्यांना मिळाली !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबा. ९९२३८४७२६९

(कविवर्य सुरेश भट यांची मन:पूर्वक माफी मागून)

॥ विडंबन ॥


Monday, May 10, 2010

चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

विडंबन कविता

चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !

जरा खोचक, जरा खरोखर बोलू काही !
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
उगाच वळसे ज्योतिषाचे हे देत रहा तू
उघडत नाही डोळे तोवर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
रेघोट्या पाहुन हातावर कुडमुडतो जोश्या
ग्रह फिरू दे त्याचे नंतर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
हवेहवेसे भविष्य तुला जर हवेच आहे
नको नको्श्या वर्तमानावर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !!
उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन
पिंजर्यातल्या त्या पोपटावर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
कुणी टाकतो पत्ते,कुणी पाहतो कुंडल्या
नसलेल्या त्या राहू-केतूवर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
कुंडल्या,पोपट या गोष्टी जुन्या जाहल्या
संगणकाच्या सॉफ्ट्वेअरवर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
विश्वास असू दे मनामध्ये साथी म्हणुनी
मती वेंधळी प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
(कविवर्य संदीप खरे यांची क्षमा मागुन)
10मे2010