Showing posts with label विडंबन कविता. Show all posts
Showing posts with label विडंबन कविता. Show all posts

Monday, May 10, 2010

चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही...सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

विडंबन कविता

चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !

जरा खोचक, जरा खरोखर बोलू काही !
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
उगाच वळसे ज्योतिषाचे हे देत रहा तू
उघडत नाही डोळे तोवर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
रेघोट्या पाहुन हातावर कुडमुडतो जोश्या
ग्रह फिरू दे त्याचे नंतर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
हवेहवेसे भविष्य तुला जर हवेच आहे
नको नको्श्या वर्तमानावर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !!
उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन
पिंजर्यातल्या त्या पोपटावर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
कुणी टाकतो पत्ते,कुणी पाहतो कुंडल्या
नसलेल्या त्या राहू-केतूवर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
कुंडल्या,पोपट या गोष्टी जुन्या जाहल्या
संगणकाच्या सॉफ्ट्वेअरवर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
विश्वास असू दे मनामध्ये साथी म्हणुनी
मती वेंधळी प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्तहो भविष्यावर बोलू काही !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
(कविवर्य संदीप खरे यांची क्षमा मागुन)
10मे2010


Saturday, May 8, 2010

ये रे घणा,ये रे घणा.....सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

ये रे घणा,ये रे घणा..... 

ये रे घणा, ये रे घणा 
घाव घाल माझ्या मना 

बोली माझी मिळूमिळू, 
मते बघ गुळूगुळु 
नको नको म्हणताना, 
गंध गेला कानोकाना 
ये रे घणा, ये रे घणा 
घाव घाल माझ्या मना 

टाकुनिया लाजबिज,
रूचणार, रूचणार 
होय होय म्हणताना, 
मनगटी भर चुना 
ये रे घणा, ये रे घणा 
घाव घाल माझ्या मना 

नको नको किती 
म्हणू, मारणार बोंब 
जणू भूलवतो खोटार्ड्यांचा, 
मारा मला पुन्हा पुन्हा
ये रे घणा, ये रे घणा 
घाव घाल माझ्या मना 

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-.९९२३८४७२६९
---------------------------------

 (आरती प्रभू यांची मन:पूर्वक माफी मागुन)

Thursday, April 29, 2010

वाढे अंधाराचे जाळे



















वाढे अंधाराचे जाळे

वाढे अंधाराचे जाळे
लोड शेडींग शेडींग
घरा घरा्ला अंधाराचे
बघा बाशिंग बाशिंग.

लोक जागे झाले सारे
सार्‍या गल्ल्या जाग्या झाल्या
डा्स चावता लेकरां
संगे जागती माऊल्या
ऐका अनोखे आवाज
डास खुषींग खुशींग.

रोज फिरून दमली्‍
सार्‍या पंख्यांची पाती
सय जुनीच नव्याने्‍
आली ए.सीं.च्या ओठी
क्षणा-क्षणाला जाते
लायटींग लायटींग.

झाला आजचा प्रकाश
सदा काळॊख काळोख
वाढत्या विज बीला
युनिट्चा अभिषेक
सारे रोजचे तरीही
सारे सोशिंग सोशिंग.

इनव्हर्टरची झाली
झाली कशी दमछाक
कमी पडे जनरेटा
नसे कुणाचाच धाक
तुझ्या नसण्याची कळ
सारी चिटींग चिटींग.

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य सुधीर मोघे यांची माफी मागुन)

Thursday, April 22, 2010

चेंडोबा चेंडोबा थकलास का ?

चेंडोबा चेंडोबा थकलास का ?

चेंडोबा चेंडोबा थकलास का ?
IPL च्या पैशामध्ये लपलास का ?
IPL चे झाड बेधुंदी,
क्रिकेटचा राडा बेबंदी !

कसोटी-वनडॆ वर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
चौकार षटकार खाशील का ?

कसोटी बिच्चारी रडत असेल,
वनडॆचा पारा चढत असेल !
असाच बसून पहाशील का ?
मालकांची बोलणी खाशील का ?

म्हातारे सगळे तरूण झाले,
फिटनेस-बिट्नेस करून आले.
त्यांच्याप्रमाणे तुही नाचशील का?
जादू की झप्पी घेशील का?

चेंडोबा,चेंडोबा कुठे रे गेला ?
ठोकता ठोकता गडप झाला !
चिअर्स गर्ल्सला समजून घेशील का?
टॅक्सवाल्यांना तोंड देशील का ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कविवर्य ग.दि.माडगूळकर यांची क्षमा मागुन)

Monday, April 5, 2010

या वीजेने या कविला दान द्यावे..सूर्यकांत डोळसे यांची विडंबन कविता

| विडंबन कविता || 


या वीजेने या कविला दान द्यावे 

या वीजेने या कविला दान द्यावे 
या वीजेने या कविला दान द्यावे 
थकले बील तरी समजून घ्यावे. 

कोणती पुण्ये अशी येती फळाला? 
वीजेचे कनेक्शनच तोडून जावे. 
 या वीजेने या कविला दान द्यावे 
आणि माजी आमदारास सुख व्हावे. 

का मागती दादा माफी माझी ? 
आली संधी तर मी भांडून घ्यावे. 
नको म्हणता,का भरले बील माझे? 
जनता सामान्य,मग आम्ही कसे राजे? 

मी असा आनंदुन बेहोष होता 
हे ’गांधारी’,तु डोळे खोलुन पहावे. \

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) 

 (कविवर्य ना.धों.महानोर यांची माफी मागुन)

|

Monday, January 4, 2010

आज वाटेतच रंग उधळतो टपोरी

आज वाटेतच रंग उधळतो टपोरी

आज वाटेतच रंग उधळतो टपोरी
बालिके, जरा जपून जा कॉलेजवरी

तो छचोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल चिठ्ठी फे्कतो
मस्ताऊन, माजून जाळे टाकतो
सांगतो अजूनही तुला खरोखरी

सांग कामांधास काय जाहले
त्यांनी छेडल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग ढंग संग लागली
एकटीच वाचशील काय तू पोरी?

त्या तिथे असंग संग त्यात गुंगला
ट्पोर-ट्पोर्‍यासवे बेधूंद दंगला
तो पहा ढोल इज्जतीचा वाजला
हाय माजले फिरुन तेच टपोरी.

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(कवीवर्य सुरेश भट यांची माफी मागुन.)

Monday, December 14, 2009

या नेत्यांनो........सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता,

विडंबन कविता


या नेत्यांनो... 

या नेत्यांनो, या रे या ! 
लवकर भरभर सारे या ! 
मजा करा रे, मजा मजा ! 
हेच दिवस तुमचे समजा. 

मस्त असे, जनता फसे; 
नवभूमी दाविन मी, 
त्या नगराला लागुनिया 
सुंदर ही दुसरी दुनिया. 

या नेत्यांनो! या रे या ! 
लवकर भरभर सारे या !
खळखळ थोडी करती खरे, 
लोक झोपले चहुंबाज बरे; 

जिकडे तिकडे माल मिळे, 
जनता विसरे, सगळे-सगळे. 
मत जयांचे, सोन्याचे पाजावे, 
माजावे. 
तर मग कामें टाकुनी या 
हवी बघाया ही दुनिया ! 
या नेत्यांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या ! 

उघडे दरवाजे चोरांना, 
लावुया चुना थोरांना, 
नोटा फडकिल्या घोड्यांना, 
मौज न दिसे ही वेड्यांना. च
पलगती, खाऊ किती ? 
हे खावे? ते खावे? 
तर हात लवकर धुवुनी या 
हवी बघाया ही दुनिया ! 
या नेत्यांनो, या रे या 
लवकर भरभर सारे या ! 


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269


 (कविवर्य भा.रा.तांबे यांची क्षमा मागुन)

Thursday, November 26, 2009

भेट तुझी माझी स्मरते..........सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता


विडंबन कविता


भेट तुझी माझी स्मरते......


भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती पिच पाकिस्तानची

तुझा तेंव्हा नव्हता, आजच्यासारखा दरारा
पाकड्यांच्या तोंडून वाहिला नुसताच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, अब्दुलच्या फिरकीची

क्षुद्र लौकिकाची, खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी क्रिकेट प्रीती
तुला तरी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची

धावांचे डॊंगर आहेत,अजून तुझ्या बॅटखाली
धावफलक सांगतात त्यांची किती शतके झाली
विक्रमांनी लिहीली गाथा, खेळलेल्या विसाची

बदडलास शेन वॉर्न वॉर्न केला त्याचा घास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे त्यास भास
क्रिकेटलाही भोवळ आली मधुर सहवासाची

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

(कविवर्य मंगेश पाडगावकर यांची मनःपूर्वक क्षमा मागून)

२६नोव्हेंबर२००९

अबू अबू वढाय वढाय .....सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता

विडंबन कविता

अबू अबू वढाय वढाय 


अबू अबू वढाय वढाय 
उभ्या पीकातलं ढोर 
किती हाकला हाकला 
फिरी जातो वळणावर. 

अबू मोकाट मोकाट 
त्याले ठायी ठायी वाटा 
जशा तोर्‍याने चालल्या 
गटारतल्या रे लाटा 

अबू लहरी लहरी 
त्याले हाती धरे कोन? 
उंडारलं उंडारलं 
जसं वारा वाहादन 

अबू जह्यरी जह्यरी 
याचं न्यारं रे तंतर 
आरे, इचू, साप बरा 
त्याले उतारे मंतर! 

अबू पाखरू पाखरू 
त्याची काय सांगू मात? 
आता व्ह्ता मुंबईत 
गे्ला गेला यु.पी.त 

काढी चप्पल चप्पल 
त्याले नही जरा धीर 
त्याले सांगा समजून 
मग येईल जाग्यावर 

अबू एवढा एवढा 
जसा मिठाचा दाना 
सार्‍या देशात जसा 
एकटाच हा शहाणा 

अबू, कसं देलं मन 
असं नही दुनियात! 
आसा कसा रे तू 
अबू काय तुझी करामत! 

अबू,असं कसं मन? 
का संधान सांधल? 
लोकशाहीचं थडगं 
तुम्ही विधानसभेत बांधलं! 


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

(कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची मनःपूर्वक क्षमा मागून)

सांगा कस मरायचं?...सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता

विडंबन कविता

सांगा कस मरायचं?

सांगा कस मरायचं? सांगा कस मरायचं? 
कण्ह्त कुण्ह्त की गाणं म्हणत तुम्हीचं ठरवा! 

डोळे वासून तुमची आठवण कोणीतरी काढतंच ना? 
शिळेपाके दोन घास तुमच्यापुढे वाढतंच ना? 
दोष देत बसायचं की रोष घेत बसायचं? 
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात जेव्हा काही दिसत नसतं 
तुमच्या साठी कोणीही दवा घेऊन उभं नसतं 
कळोखात कुढायचं की प्रकाशात रडायचं ? 
तुम्हीचं ठरवा!

 बायकांत पॊट्टे रमुन बसतात हे अगदी खरं असतं; 
आणि नातू मांडीवर हसतात हे काय खरं नसतं? 
पोटट्यांसारखं रमायचं की नातवांसारखं दमायच? 
तुम्हीचं ठरवा! 

काळ बराच सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं 
काळ थोडाच उरला आहे असं सुद्धा म्हणता येतं,
सरला आहे म्हणायचं की उरला आहे म्हणायचं? 
तुम्हीचं ठरवा! 

सांगा कस मरायचं? कण्ह्त कुण्ह्त 
की गाणं म्हणत तुम्हीचं ठरवा! 

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

(कविवर्य मंगेश पाडगावकर यांची मनःपूर्वक क्षमा मागून)

झुक झुक झुक झुक आगीनगाडी..सूर्यकांत डोळसे यांचे विडंबन कविता

विडंबन कविता

झुक झुक झुक झुक आगीनगाडी....


झुक झुक झुक झुक आगीनगाडी 
झुक झुक झुक झुक आगीनगाडी

झुक झुक झुक झुक आगीनगाडी 
बोटांच्या रेषा कानामागे काढी 
पळते सैनिक पाहूया,
काकाच्या गावाला जाऊया 

काकाचा गाव मोठा,
तिकीटासाठी मोजा नोटा 
शोभा पाहुनी घेऊया, 
काकाच्या गावाला जाऊया 

काकाचा पोरगा फोटोग्राफर,
म्हणेल कुठले हे लोफर? 
फोटो काढून घेऊया,
काकाच्या गावाला जाऊया. 

त्याचा पी.ए.सुगरण,
रोज रोज नवे प्रकरण 
मिलिंद मिलिंद गाऊया,
काकाच्या गावाला जाऊया 

काका मोठा चित्रकार,
व्यंग काढी बहारदार 
अग्रलेख नावे ठोकूया,
काकाच्या गावाला जाऊया 

 -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
   मोबाईल-9923847269

(कविवर्य ग.दि. माडगूळकर यांची मनःपूर्वक क्षमा मागून)